श्रमिक पत्रकार भवनात नागरिकांची मोठी गर्दी!
चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन चंद्रपूरकरांसाठी श्रमिक पत्रकार भवन येथे उपलब्ध करून देण्यात आले होते.
बारामतीहून अस्थिकलश चंद्रपुरात आणण्यात आला. सकाळी १०:३० वाजल्यापासूनच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून राजकीय , सामाजिक, शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि नागरिक आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी दाखल झाले. दर्शन घेताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या, अनेकांचे डोळे पानावले होते.
अजितदादांच्या कामाची पद्धत, त्यांचा रोखठोक स्वभाव आणि त्यांनी दिलेले योगदान याबद्दल कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "प्रशासनावरील पकड आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा लोकनेता हरपला," अशा शब्दांत अनेकांनी शोक व्यक्त केला. आज या अस्थिकलशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील 'वढा' येथील पवित्र नदीपात्रात अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन केले जाईल. दादा जरी आता आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांच्या आणि कामाच्या रूपाने ते सदैव महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जिवंत राहतील.

