महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर, जनसेवक सन्मान सोहळा भावनिक वातावरणात संपन्न...!

Bhairav Diwase
प्रेरणादायी उपक्रम; जनसेवक सन्मान सोहळा संस्मरणीय..!


मुल:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ. दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा, २०२६ सेवाभाव, कृतज्ञता आणि प्रेरणेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला सलाम करण्याचा हा क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी, विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हा सचिव तथा दैनिक महासागर जिल्हा प्रतीनीधी प्रवीण बलकी होते.
प्रमुख अतिथी म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकताताई समर्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, नागपूर जिल्हाध्यक्ष शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी सत्यजित आमले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उजळलेला दीप हा सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक ठरला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
  यावेळी प्रा. महेश पानसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला योग्य दिशा देणारी शक्ती आहे. जनतेसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळते आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.” त्यानंतर त्यांचा वाढदिवस केक कापून अभिष्टचिंतन सोहळा आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
    या सन्मान सोहळ्यात मूल नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण, समाजकार्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
     याच सन्मान सोहळ्यात भद्रावती तालुका अध्यक्षपदी चंद्रपूर समाचार तालुका प्रतीनीधी संतोष उर्फ पवन शिवणकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेचा विश्वास लाभल्याचा हा क्षण त्यांच्यासाठी भावूक ठरला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने मत व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकार संघ हे केवळ सन्मानापुरते मर्यादित नसून पत्रकारांच्या हक्कांसाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि समाजातील सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. तालुका ते जिल्हा पातळीवर संघटन मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे.”
    या सोहळ्याचे सूत्रसंचालन थेरे सर यांनी केले, तर ऍड. राहुल थोरात यांनी आभार मानले.
    या सन्मान सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष प्रमुख उपस्थितीत सहभागी झाले होते. त्यामुळे संघटनात्मक एकतेचे प्रभावी दर्शन घडले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या नेतृत्वाखाली सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.