वरोरा:- तालुक्यातील वडगाव मुरदगाव जवळील नाल्यात एका तीन वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने वाघिणीचा मृत्तदेह ताब्यात घेतला आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील खांबाडा ते नागरी या मार्गावरील वडगाव मुरदगाव येथील नाल्यामध्ये (रविवार) दुपारच्या सुमारास एका तीन वर्षे वयाच्या वाघिण मृतावस्थेत काही लोकांना आढळून आली. लगेच नागरिकांनी वरोऱ्याचे वनसंरक्षक सतीश शेंडे यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. त्यांनी वरिष्ठांना माहिती देत घटनास्थळ गाठले.
घटनास्थळी येवून अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी नाल्यात पडून असलेला वाघिणीला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वन्यजीव उपचार केंद्र, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. यावेळी उपवसंरक्षक सतीश शेंडे, सहाय्यक वनसंरक्षक नायगमकर, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर् उपस्थित होते. ज्या ठिकाणी मृत्तदेह आढळून आला ते ठिकाण रस्त्यालगत आहे. त्यामूळे वाहनाची धडक लागून वाघीण नाल्यात पडली आणि वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.