Click Here...👇👇👇

30 हजार नागरिक घेऊ शकतील 'जाणता राजा'चा आनंद #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेमार्फत शिवछत्रपतींच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे 'जाणता राजा' या महानाट्याचे आयोजन येत्या 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी येथील चांदा क्लब मैदानावर करण्यात येत आहे.

दरदिवशी एक सादरीकरण होईल. तीन दिवस प्रत्येक 10 हजार याप्रमाणे 30 हजार नागरिक या महानाट्याचा आनंद घेऊ शकतील. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे प्रयोग राज्यभर होत आहेत, अशी माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रपरिषदेत दिली.

पत्रपरिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त शासनाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचाच एक भाग म्हणून हे महानाट्य चंद्रपुरात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. मंचावर अन्य मान्यवरही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रत्येक दिवशी 10 हजार नागरिकांना पाहता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रत्येक दिवसाकरिता नागरिकांसाठी विविध संघटना, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी आदींसाठी पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या ठिकाणी नागरिकांसाठी पासेस वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशिकेशिवाय प्रवेश मिळणार नाही, असेही गौडा यांनी यावेळी सांगितले.