तुकडोजी महाराजांचे विचार मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडविणारे - ॲड. संजय धोटे
चुनाळा येथे भव्य विदर्भ स्तरीय भजन स्पर्धा.
राजुरा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे मानवी जीवनाला चांगली कलाटणी देणारे असून हे विचार कृतीत आल्यास व रोजच्या जीवनात अंमलात आणल्यास मानवामध्ये अमुलाग्र बदल घडून येणे नक्कीच शक्यप्राय होईल, असे मत माजी आमदार तथा भाजपा नेते ॲड. संजय या. धोटे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील चुनाळा येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व शिव जयंती उत्सव समिती, चुनाळा कडून विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार ॲड. संजय धोटे, अध्यक्ष म्हणून केंद्रीय सदस्य तथा तालुकाध्यक्ष अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळ ॲड. राजेंद्र जेणेकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपतालुका सेवा अधिकारी लटारु मत्ते, प्रचार प्रमुख गजानन बोबडे, मोहन वडस्कर, भाजपा तालुका महामंत्री इंजी. प्रशांत घरोटे, अनिल पिदूरकर, देवराव गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना ग्रा.पं. सदस्य तथा स्पर्धेचे आयोजक रविंद्र गायकवाड यांनी गावातील विकास कामे उपस्थितांच्या लक्षात आणून देत गावातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, मैदाणी सरावासाठी क्रीडा संकूल, शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा यासाठी पांदन रस्ते यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून उपस्थित अतिथींनी ही या मागण्या पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. प्रमुख अतिथी ॲड. राजेंद्र जेणेकर यांनी अशा स्पर्धांमधून महापुरूषांचे विचार हे सामान्यापर्यंत भजनाचा माध्यमातून पोहचत असून या विचारातून ग्रामविकास होण्यास बळ मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थिती पाहूण्यांना भेट स्वरुपात महापुरूषांच्या विचारांची पुस्तके देण्यात आली. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अंकुश चव्हान यांनी तर प्रास्तावीक व आभार ग्रा.प. सदस्य रवींद्र गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेकरीता रंजीत डाखरे, गजानन हेपट, अनिल तामटकर, वैभव माणूसमारे, कमलेश वांढरे, अभय माणुसमारे, स्वप्नील निखाडे, रवी वांढरे, सत्यपाल निमकर, सुरेश आस्वले, मनिष कायरकर यांचेसह मंडळातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.