सर्व्हिस रोडच बनला मटन मार्केट, भद्रावती नगरपरिषदेचे दूर्लक्ष? #Chandrapur

Bhairav Diwase
नगरपरिषद, पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करणार का? नागरिकांचे लक्ष


भद्रावती:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती ने ठाणेदार भद्रावती यांच्या मार्फत दि.१ फेब्रूवारी ला पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर यांच्याकडे लेखी पत्राव्दारे भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेच्या दोन्ही बाजुचे सर्व्हिस रस्ते रहदारीसाठी मोकळे करा, अशी मागणी केली आहे.

शहरातील चंद्रपूर-नागपूर मुख्य हायवेच्या दोन्ही बाजुला नागरिकांना ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रस्ता हा सुमठाणा ते सुर्वे गराज पर्यंत बांधला आहे. शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेच्या दोन्ही बाजुला वस्ती आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्य हायवेला न जाता सर्व्हिस रस्त्याचा वापर करून शहरात ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रस्ता बांधला गेला. रस्ता ओलांडताना कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही किंवा जीवितहानी होऊ नये तसेच मुख्य हायवेच्या रहदारीला व्यत्यय येवू नये यासाठी सर्व्हिस रस्ता आणि अंडरपास ची सुविधा भद्रावतीकरांसाठी केल्या गेली. मात्र दोन्ही बाजुचे सर्व्हिस रस्ते हे बेशिस्त पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी, ऑटो, ट्रॉली आणि मटन मार्केट ने नेहमी बंद असतात. हॉटेल, दुकाने यांच्याच गाड्या रस्त्यावर असल्यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. कित्येकदा यावरून दुकानदार आणि ये-जा करणारे नागरिक यामध्ये भांडण होतात.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडे भद्रावती शहरातील नागरिकांनी सर्व्हिस रस्त्या बद्दल आपले मत व्यक्त केले होते. अनेकदा अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने या विषयासंदर्भात मुख्याधिकारी भद्रावती यांना पत्राव्दारे लक्ष देण्यास सांगितले. मात्र या विषयाकडे नगरपरिषदेने गंभीरपणे पाहीलेले दिसत नाही. त्यामुळेच ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा गेटच्या डाव्याबाजूला मटन विक्रेते सऱ्हास रस्त्याच्या मध्यभागी आपले दुकान सजवून बसतात. मटन मार्केट मुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे नगरपरिषद प्रशासनाला माहीत असुन सुद्धा यावर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. मटन विक्रेत्यांना नगरपरिषदेने अभय दिल्याचे यातुन स्पष्ट होते.

 आता तरी नगरपरिषद, पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी याकडे लक्ष देऊन कारवाई करणार का? याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.