गडचिरोली:- लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य उफाळून आले आहे. डॉ. चंदा व डॉ. नितीन कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. तिकीट वाटपासाठी पक्षात पैशांचा निकष लावल्याचा दावा त्यांनी २६ मार्च रोजी केला आहे.
डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्याक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अद्याप दिला नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, संदीप सुरजागडे आदी उपस्थित होते. डॉ. उसेंडी हे २००९ मध्ये काँग्रेसकडून गडचिरोली विधानसभा मतदासंघांतून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले, पण त्यांना यश आले नाही.
दरम्यान, तिसऱ्यांदा ते काँग्रेसकडून इच्छुक होते, पण त्यांना डावलून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले डॉ. उसेंडी यांनी काँगेस आदिवासी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.