"संविधानात बदल हा काँग्रेसचा अपप्रचार," उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले.... #Chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
चंद्रपूर:- ज्या काँग्रेसने काश्मीरला संविधानापासून वंचित ठेवले, त्या काश्मीरला संविधान बहाल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीबद्दल काँग्रेस केवळ अपप्रचार करीत आहे. यावर विश्वास न ठेवता महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देऊन मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भद्रावती येथील पिपराळे सभागृहाच्या बाजूला झालेल्या विशाल विजय संकल्प सभेत केला.

व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, वनिता कानडे, अल्का आत्राम, भाजपचे करण देवतळे, रमेश राजूरकर, विजय राऊत, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नितीन मत्ते, तुळशीराम श्रीरामे, सुनील नामोजवार, चंद्रकांत गुंडावार, प्रशांत डाखरे, हरीश दुर्योधन, प्रकाश देवतळे, आदी उपस्थित होते.

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बोलताना फडणवीस म्हणाले, मोदींनी नऊ वर्षांपूर्वी जेव्हा सत्तेची सूत्रे हाती घेतली तेव्हा 'मॉनिटरी फंड'च्या अहवालात देशाची अर्थव्यवस्था ही इतर पाच देशांच्या तुलनेत अतिशय हलाखीची होती. पण नऊ वर्षांत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे 'मॉनिटरी फंड'चाच आता अहवाल आला आहे. ही मोदींच्या कामाची पावती आहे.

पंतप्रधान मोदींनी गेल्या नऊ वर्षात २० कोटी लोकांना स्वतःची पक्के घरे देऊन, २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले. ४० कोटी लोकांना नळाद्वारे शुद्ध पाणी देऊन ३० कोटींपेक्षा जास्त लोकांना आयुषमान भारत योजनेअंतर्गत औषधे आणि उपचार उपलब्ध करून दिला. त्यांना पुन्हा एकदा बहुमत दिल्यास विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.