वरोरा:- जुन्या वैमनस्यातून एका युवकाच्या गळ्यावर व पोटावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना माजरीपासून चार किमी अंतरावरील वणी-वरोरा मार्गावर जगन्नाथबाबा मठाजवळ शुक्रवारी दि. २६ एप्रिलला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. धीरज घानोडे (२४, रा. पाटाळा) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर चंद्रपुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. फरार आरोपी वेदांत हिकरे (२२, रा.राजूर कॉलरी) याला यवतमाळ येथून अटक केली.
जखमी युवक धीरज घानोडे हा पाटाळा येथे शुक्रवारी घरीच होता. आरोपी वेदांत हिकरे याने रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास डिझेल घेण्याच्या बहाण्याने फोन करून धीरजला राळेगाव फाटा जगन्नाथ मंदिराजवळील पुलाखाली बोलाविले. त्या ठिकाणी आरोपीचा मित्र प्रज्वल शेंडे हाही हजार झाला. मात्र, आरोपीने प्रज्वलला खर्रा आणण्यास बाहेर पाठविले आणि धीरज घानोडे याच्या मानेवर व पोटात धारदार चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला, धीरज घानोडे याच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच, मावस भाऊ सतीश बोधणे याने माजरी पोलिसांना माहिती दिली.