पोलीस-नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यामधील कतरंगट्टा गावाजवळच्या जंगलात सोमवारी झालेल्या चकमकीत नक्षलवादी कमांडर वासू याच्यासह 2 महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. एका गुप्त माहितीच्या धारे पोलिसांनी ही कारवाई केल्याचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगलात नक्षलवाद्यांच्या पेरिमिली दलमचे काही सदस्य विध्वंसकारी कारवाया करण्यासाठी तळ ठोकून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार या परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू असतानाच या परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या सी- 60 जवानांशी या नक्षलवाद्यांची जोरदार चकमक झाली.


यात पेरिमिली दलमचा प्रभारी व माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह 2 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर एक पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. पेरिमिली दलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांड वासू याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरे दोन महिला नक्षल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, घटनास्थळी 3 स्वयंचलित शस्त्रे आढळून आली. यात एकएके-47, एक कार्बाइन आणि एक इन्सास रायफलचा समावेश आहे. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या