नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापतीसह 6 जण 1.82 लाखाची लाच घेताना जाळ्यात #chandrapur #gondia #ACB

Bhairav Diwase

गोंदिया:- सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदानातून तयार करण्यात आलेल्या बांधकामाच्या निविदेच्या रक्कमेवर 15 टक्के कमीशनची मागणी करुन त्या 15 टक्के कमीशनची रक्कम स्विकारल्याने जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तेजराम मडावीसह,नायब तहसिलदार व प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे,बांधकाम सभापती अश्लेष अंबादे,नगरसेवक महेंद्र रंगारी व नगरसेविकेचे पती खासगी ईसम जुबेर अलीम शेख राजू शेख व खासगी इसम शुभम रामकृष्ण येरणे यांना 1 लाख 82 हजाराची लाच घेतल्याप्ररकरणात एसीबीने दि. 14 मे ला सापळा रचून अटक केली.

सविस्तर असे की, तक्रारदाराचा मुलगा कंत्राटदार असून सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन 2023-24 लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या होत्या.त्या कामाच्या निविदेपोटी तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली. व कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदाराने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रकमेच्या 15% रक्कम लाचेची मागणी केली.मात्र तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दि. १३ मे ला केली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली.त्यावर प्रभारी मुख्याधिकारी हलमारे यांनी नगराध्यक्ष मडावी यांची भेट घेण्यास सांगितले.त्यामुळे तक्रारदाराने नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता लोकसेवक असलेले नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी निविदा रक्कम रू 12,15,634/-रक्कमेवर 15% टक्के प्रमाणे रू 1,82,000/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली. तसेच मुख्याधिकारी, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेवक यांचे पती व एका खासगी इसमाने त्या लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले.तसेच नगराध्यक्ष मडावी यांनी लाच रक्कम खासगी इसम असलेले शुभम रामकृष्ण येरणे यांच्या दुकानात देण्यास सांगितल्याने तक्रारदाराने खासगी इसम असलेले शुभम येरणे यांच्या दुकानात रक्कम दिली असता ती लाच रक्कम स्विकारल्याने लाचलुचपत विभागाने आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेतले. 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले ,चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली आहे.


तक्रार कारायची आहे; संपर्क साधा

गोंदिया जिल्ह्यातील नागरीकांना कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ टोल फ्रि क्रंमांक 1064 वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.