राज्यात भाजपची खरी लढत काँग्रेसशी; तर उद्धवसेनेचा सामना शिंदेसेनेशी! #Chandrapur #loksabhaelection-2024 #Maharashtraloksabha

Bhairav Diwase
लोकसभा निवडणुकीचे राज्यातील एकूण 48 मतदारसंघांतील लढतींचे चित्र मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर स्पष्ट झाले आहे. राज्यात 15 लोकसभा मतदारसंघांत भाजपची लढत काँग्रेसशी होणार आहे, तर उद्धवसेना आणि शिंदेसेनेत 13 जागांवर जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.

🆗
विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिंदेसेनेचा एकाही मतदारसंघात मुकाबला नसल्याचे चित्र आहे.
🆗
महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेना 21 जागा लढत आहे, तर महायुतीमध्ये शिंदेसेनेने 15 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे या पट्ट्यात चुरस दिसत आहे. भाजप काँग्रेसविरुद्ध लढत असलेल्या 15 जागांपैकी सहा जागा या विदर्भातील आहेत. विदर्भात एकूण 10 जागा आहेत. त्याखालोखाल भाजप मराठवाड्यात तीन, तर पश्चिम महाराष्ट्र व मुंबईत दोन ठिकाणी काँग्रेसशी झुंजणार आहे.

शिंदेसेनेची सर्व शक्ती ठाकरेंविरुद्ध

शिंदेसेनेचे सुमारे 85 टक्के उमेदवार उद्धवसेनेशी लढत आहेत. शिंदेसेनेची शक्ती ठाकरेंविरुद्ध खर्ची पडत आहे. ज्या राष्ट्रवादीविरुद्ध शिंदेसेनेने फुटीआधी रान उठविले होते, त्याविरुद्ध एकही उमेदवार नाही.

शिवसेनेला यश मर्यादितच

2019 च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे राज्यात 18 खासदार निवडून आले होते. यंदा दोन गट असले तरी शिवसेना म्हणून एकमेकांविरुद्ध लढणारे 13 खासदार निवडून येण्याची संधी आहे. याशिवाय उद्धवसेना भाजपशी पाच जागांवर आणि एका जागेवर रासपशी लढत आहे, तर शिंदेसेना काँग्रेसशी दोन ठिकाणी लढत आहे. या ठिकाणाचे दोन्ही शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आले तरी उद्धवसेना आणि शिंदेसेनेची मिळून खासदारांची संख्या 20 च्या वर जाणार नाही, याची काळजी भाजपने घेतल्याचे दिसते.

राज्यातील लढतीचे चित्र

उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना- 13
मतदारसंघ- दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली.

उद्धवसेना विरुद्ध भाजप - 5 मतदारसंघ - उत्तर पूर्व मुंबई, पालघर, सांगली, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, जळगाव.

उद्धवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - 2 मतदारसंघ- उस्मानाबाद, रायगड

उद्धवसेना विरुद्ध रासप - 1 मतदारसंघ - परभणी.

काँग्रेस विरुद्ध भाजप - 15 मतदारसंघ - उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई, सोलापूर, पुणे, नंदूरबार, धुळे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, जालना.

काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना - 2 मतदारसंघ - कोल्हापूर, रामटेक

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध भाजप- 8
मतदारसंघ - भिवंडी, सातारा, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, वर्धा, बीड.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - 2
मतदारसंघ - बारामती, शिरुर.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) विरुद्ध शिंदेसेना- 00

काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) - 00