Pratibha Dhanorkar : ताई तुमचाच वापर करून चोरले ‘लाडक्या बहिणी’चे नाव #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आपल्याच बहिणींसाठी असलेल्या योजनेचे नाव 'लाडक्या ताई'साठी चोरल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे. या ताई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आहेत. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेला मंगळवारपासून (ता. 02) राज्यात सुरुवात झाली. मात्र ताईंच्या एका कार्यकर्त्याने चक्क त्यांच्याच लाडक्या बहिणींसाठी असलेल्या योजनेचे नावच चोरून टाकले. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" असे लिहिण्याऐवजी त्याने भलतेच कृत्य केले. 'प्रतिभा धानोरकर लाडकी बहिण योजना' असे नाव देत एकाने पोस्ट व्हायरल केली आहे.

पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचे नाव धम्मा निमगडे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. निमगडे यांच्या मोबाइल क्रमांकासह भाजपने या प्रकाराची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. शासकीय योजनेचे नाव बदलून हा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांची दिशाभूल करण्यात आली आहे. परिणामी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी आता भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या महिला प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, सुलभा पिपरे, सुनिता म्यॅकलवार, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, नंदा कोटरंगे, वैशाली वासलवार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.