वेतन वाढ न झाल्यास गोंडपिपरी येथील सफाई कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा.

Bhairav Diwase
वेतन वाढ न झाल्यास गोंडपिपरी येथील सफाई कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा.

१४ दिवसांचे प्रशासनाला दिले अल्टिमेट


गोंडपिपरी:- सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी येथील नगरपंचायत अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या सफाई कामगारांना गेल्या वर्षभरापासून वेतन वाढीमध्ये कुठलीही वाढ झाली नसून कामगार फक्त २०० रुपये रोजी प्रमाणेच म्हणजेच ६०००/- रु महिन्याने काम करित आहेत. जेव्हा की शासनाने ठरविलेल्या किमान वेतनानुसार कामगारांना १४०००/- रुपये च्या वर वेतन शासनाच्या वेजेस मध्ये आहे. याबाबत गोंडपिपरी येथील नगरपंचायत मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आधी देखील पगारवाढी संदर्भात कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला असून देखील दिलेल्या पत्त्रांची नगरपंचायत ने अद्याप कुठलीही दखल घेतली नसल्याने कामगारांना किमान वेतनानुसार पगार तर मिळत नाहीचं परंतु वेतन मध्ये कुठलीही वाढ केली जात नसल्याने कामगारांची कंत्राटदारांकडून व नगरपंचायत कडून आर्थिक पिळवणूक होत सातत्याने होत आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद व नगरपंचायत ला किमान वेतनानुसारच वेतन देण्याचे स्पष्ट आदेश असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी केली जात नसल्याचा फायदा हा कंत्राटदार व नगरपंचायत ला कामगारांची आर्थिक करून मिळतो. या सर्रासपणे होत असलेल्या कामगार कायद्याच्या नियमाचे उल्लंघन पाहता दिनांक:- १३/०८/२०२४ तारखेपासून १४ आठवड्यात कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे शासनाने ठरविलेल्या बदलत्या किमान वेतनानुसार वेतन न मिळाल्यास अथवा पगार वाढीमध्ये वाढ न झाल्यास दिनांक २८/०८/२०२४ पंधराव्या दिवशी पासून श्री. सुरजभाऊ ठाकरे संस्थापक अध्यक्ष जय भवानी कामगार संघटना तथा कामगार जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात समस्त कामगार काम बंद आंदोलन करतील व काम बंद आंदोलन करत असताना नगरपंचायत ला इतर कोणत्याही कामगारांना त्यांच्या जागी काम करू देणार नाही.
ज्या प्रकारे या कामगारांच्या युनियन आहेत त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या देखील नगरपंचायत, नगरपरिषद येथील कर्मचाऱ्यांच्या देखील युनियन असतात व हे देखील आपल्या मागण्यांकरिता संप पुकारत काम बंद आंदोलन करत असतात तर तो कायदेशीर असतो परंतु हेच आंदोलन जर कामगारांनी केलं महसूल विभागाचे शासकीय कर्मचारी यांचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न का करतात? हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपलं ते बाप्या आणि दुसऱ्याचं  कार्ट अशा पद्धतीची वागणूक कर्मचारीच कामगारांसोबत करत असतात. परंतु जय भवानी कामगार संघटना हे कामगारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही अशी ग्वाही यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी दिली आहे.