दुर्गापूर कोळसा खाणीत मॅनेजरकडून कर्मचाऱ्याला मारहाण #Chandrapur #WCL

Bhairav Diwase
🆒
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणीत शनिवारी (दि.15)रात्री खाणीत काम करणाऱ्या कामगाराला मॅनेजरने मारहाण केली. माईनिंग सरदार संकल्प कुंभारी यांना अंडरग्राउंड मॅनेजर बालकृष्ण जारपाला यांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांनी खाणीत काम बंद केला आहे.
🆒

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.15) दुसऱ्या पाळीतील काम सुरू असताना अंडरग्राउंड मॅनेजर बालकृष्ण जारपाला यांनी माईनिंग सरदार संकल्प कुंभारी यांना मारहाण केली. त्यांनी मद्यप्राशन करून मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत संकल्प कुंभारी गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मॅनेजरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र जारपाला यांची आक्रमकता कमी झाली नाही. या प्रकारानंतर खाणीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद केला आहे. या आंदोलनामुळे वेस्टर्न कोलफील्ड्सच्या खाणीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

🆒
या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.