
गडचिरोली:- भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावांजवळच्या जंगलात नक्षल्यांशी लढताना शहीद झालेले पोलिस अंमलदार महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.१२) अनखोडा येथे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद महेश नागुलवार यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
मानवंदना देण्यात आल्यानंतर शहीद महेश नागुलवार यांचे पार्थीव अनखोडा या गावी रवाना करण्यात आले. तेथे जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी शहीद महेश नागुलवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर 'शहीद महेश नागुलवार अमर रहे' अशा घोषणा देत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.