CM Devendra Fadnavis: महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

Bhairav Diwase
गडचिरोली:- "नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही," अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती प्राप्त झालेल्या सी-60 कमांडो महेश नागुलवार यांना अर्पण केली.


भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले. त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलिस अधीक्षकांशी थेट संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. "महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत," असे त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) वरील संदेशात स्पष्ट केले आहे.