चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात दारु दुकान व वाइन शॉपमुळे निर्माण होणाऱ्या त्रासाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. चंद्रपूर शहरातील वाइन शॉप व दारू दुकान तात्काळ स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला.
शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या या दारु दुकान व वाइन शॉपमुळे परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपींच्या राड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, असभ्य वर्तन आणि विद्यार्थ्यांची होणारी कुचंबणा याला कंटाळून आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न मनसे आणि स्थानिक महिलांनी केला.
मनसेच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर वेळीच या दारु दुकान व वाइन शॉपचे स्थलांतर झाले नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाची असेल. आजच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

