Chandrapur News: सत्ता आली, पण मनं जुळली नाहीत? चंद्रपूर भाजपमधील 'वॉर' आत्ताही सुरूचं!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर आजचा दिवस भाजपसाठी उत्सवाचा होता. नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला. ढोल ताशे वाजले, फटाके फुटले... पण या जल्लोषाच्या आवाजात नाराजीचा एक सुप्त सूरही उमटत होता. विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजीने राजकारण तापवलं आहे.

विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निमित्त ठरलं ते आमदार किशोर जोरगेवार समर्थकांची अनुपस्थिती. धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द स्थानिक आमदारांनाच या अधिकृत कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचा आरोप जोरगेवार गटाने केला आहे. हा केवळ आमदारांचा अपमान नसून तो कार्यकर्त्यांचा अपमान असल्याची भावना जोरगेवार गट समर्थकांनी व्यक्त केली जात आहे.


या अपमानाचा निषेध म्हणून जोरगेवार समर्थक असलेल्या तब्बल १६ नगरसेवकांनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. महापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला पक्षाचेच १६ नगरसेवक यांनी बाहेर निघाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वरवर सर्व काही आलबेल दिसत असले, तरी चंद्रपूर भाजपमध्ये दोन गट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


एकीकडे मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापनेचा आनंद साजरा होत असताना, दुसरीकडे जोरगेवार गटाची ही उघड नाराजी भविष्यात महापालिकेच्या कामकाजावर काय परिणाम करणार? हा अंतर्गत कलह पक्षश्रेष्ठी कसा मिटवणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.