चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणात सध्या सुधीर मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार असा सामना चांगलाच रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना मुनगंटीवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणावरून सध्या वातावरण तापले आहे. यातच भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १७ एबी फॉर्म चोरीला गेल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी नाव न घेता किशोर जोरगेवार यांच्यावर निशाणा साधला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
मुनगंटीवार म्हणाले १७ एबी फॉर्म चोरीला गेले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली यादी बदलण्याचा अधिकार कुणालाही नसतो, पण इथे जे घडलंय ते चुकिचे होते. माझ्या मंत्रीपदाबाबत काही महिन्यातच सर्वांच्या लक्षात येईल! ब्रिजभूषण पाझारे यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. "मी पाझारेंच्या उमेदवारीसाठी गेलो होतो आणि यापुढेही त्यांच्या पाठीशी उभा राहीन," असे म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना बळ दिले आहे.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी मुनगंटीवारांच्या बंगल्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना त्यांनी अत्यंत खोचक शब्दांत टोला लगावला. सपकाळ यांनी मुनगंटीवारांचे घर १००० कोटींचे असल्याचा आरोप केला होता, त्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले जर माझं घर इतकं महाग असेल, तर सपकाळांनी ते त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी खुशाल घेऊन टाकावं. विनाकारण हवेत आरोप करण्यापेक्षा त्यांनी कामावर लक्ष द्यावं.

