CDCC Bank: सिडीसीसीच्या नोकर भरती प्रक्रिया चौकशीचे निघाले पत्र

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत आरक्षण हटवून नियमबाह्य पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली गेल्याचा आरोप आहे. त्यासाठी 16 जानेवारीला आरक्षण बचाव कृती समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

त्या अनुषंगाने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी चौकशीचे पत्र प्राप्त झाले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई आणि लिपीक पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण हिरावण्यात आले व या नोकर भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत, अनेक सामाजिक संघटना मिळून आरक्षण बचाव संघर्ष समिती स्थापित करुन 2 जानेवारी पासून ठिय्या आंदोलन व त्यानंतर मनोज पोतराजे व रमेश काळबांधे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते.District Central Bankया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडीसीसी बँकेच्या नोकर भरती प्रक्रीयेच्या चौकशीचे आश्वासन उपोषकर्त्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्यानंतर बुधवार, 29 जानेवारी रोजी उपोषणाची सांगता झाली. माजी मंत्री आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी पोतराजे आणि काळबांधे यांना लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती व त्यामधील आरक्षण तसेच कामकाजाबाबतच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. या मुद्द्यांच्या अनुषंगाने तात्काळ सखोल मुद्देनिहाय चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आपला अहवाल सात दिवसांच्या आंत या कार्यालयास सादर करावा, असे जिल्हा उपनिबंधकांना आता कळविण्यात आले आहे.