Attack: 'तुला शपथ आहे....', शाळेत रक्ताची होळी, 11 विद्यार्थ्यांचा एकमेकांवर ब्लेडने हल्ला

Bhairav Diwase

बुलडाणा:- बुलडाण्याच्या शाळेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या हातावर ब्लेड मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळा बंद करून आंदोलन केलं आहे.


तसंच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. दुसरीकडे एका शिक्षकाची तात्काळ बदली केल्याची प्रतिक्रिया शिक्षणअधिकाऱ्यांनी दिली आहे. तुला शपथ आहे म्हणत हुल्लडबाजी करणाऱ्या पाचवीच्या या 11 विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये रक्त सांडवल्यामुळे खळबळ माजली आहे.


ब्लेडने कापल्यामुळे हे 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत, पण सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर इजा झालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार केले गेले आहेत. पण विद्यार्थी शाळेमध्ये ब्लेड घेऊन कसे आले? आणि एकमेकांवर ब्लेडने हल्ला करेपर्यंत शाळेचे शिक्षक कुठे होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



बुलडाण्यातील भादोला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पाचवीतल्या 11 विद्यार्थ्यांनी हातावर ब्लेड मारून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 शिक्षक आणि 198 विद्यार्थी आहेत. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसंच सर्व शिक्षकांविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं पालकांनी सांगितलं. यानंतर पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद आंदोलन केलं.