चंद्रपूर:- गरीब व गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी, सैन्य, पोलिस यांसारख्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी या शैक्षणिक वर्षात 'अम्मा की पढाई' हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे. चाचणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजारपैकी ३०० विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
१३ एप्रिल रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर ही चाचणी परीक्षा झाली. २६ मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्तानिहाय गुणांची सीमारेषा सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६२ गुण, मुलींसाठी ५८, बीपीएलसाठी ५७, दिव्यांगांसाठी ३२ आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी २१ गुण ठेवण्यात आले. यानुसार ३०० विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.
जून महिन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील, असा दावा करण्यात आला आहे.