Banned HTBT seeds: ४० किलो प्रतिबंधित बीटी बियाणे जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राजुरा पोलिसांनी प्रतिबंधित (HTBT) कापसाचे बियाणे बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत सुमारे ७६,८०० रुपये किमतीचे ४० किलो बियाणे जप्त केले आहे. ही कारवाई रविवार, २६ मे २०२५ रोजी करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राजुरा पोलिसांनी भुरकुंडा येथील वसंत शंकर पुणेकर यांच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान, त्यांच्या घरातून ४० किलो बीटी बियाणे (HTBT) आढळून आले. चौकशी केली असता, पुणेकर यांनी सदर बियाणे सुकडपल्ली येथील गटन्ना राजन्ना पाकावार यांचे असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कृषी विभागाला माहिती दिली. कृषी अधिकारी नरेश रामकृष्ण ताजने यांनी दिलेल्या अहवालानुसार, जप्त केलेले बियाणे प्रतिबंधित कापूस (HTBT) बियाणे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी हे बियाणे साठवून ठेवले होते आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ते जवळ बाळगले होते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानंतर, राजुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, भिष्मराज सोरते, पोहवा विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे आणि कृषी अधिकारी नरेंद्र ताजने, पंचायत समिती राजुरा यांनी पार पाडली.