Theft News: बस स्थानकावर प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला अटक, १८,००० रुपये जप्त

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मूल बस स्थानकावरून प्रवाशांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या एका टोळीला मूल पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरलेले १८,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत.


काय आहे प्रकरण?

२४ मे २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास यशवंत बाबुराव भरणे हे मूल बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशातून १८,००० रुपये चोरले होते. त्यांनी तात्काळ मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


पोलिसांची कारवाई:

गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मूल बस स्थानकासमोर चंद्रपूर रोडवर चंद्रपूरच्या दिशेने जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असलेला शरद वाघुजी रुयारकर (वय ४५, रा. वरोरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे चोरी केलेले १२,५०० रुपये नगदी आढळून आले.


रुयारकरच्या गुन्हेगारी नोंदी तपासल्या असता, त्याच्यावर यापूर्वीही मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याने त्याचे साथीदार ज्ञानेश्वर उर्फ नाना गुलाब मडावी आणि विजय उर्फ विजू सुधाकर बेलेकर यांच्यासोबत चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना वरोरा येथून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी झालेले उर्वरित १८,००० रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. मूल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


ही कामगिरी:

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, पोहवा जमीरखान पठाण, भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, संदीप चौधरी आणि सर्व मूल पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.



नागरिकांना आवाहन:

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बसमध्ये चढताना-उतरताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. पैसे, पाकिट, मोबाईल इत्यादी वस्तू मागील खिशात ठेवू नयेत. तसेच, काही संशयीत व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील डायल ११२ वर कॉल करून माहिती द्यावी.