Raid on the Kombada bazar: जंगलात रक्ताचा खेळ थांबला! बेकायदेशीर कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- भद्रावती तालुक्यातील तिरवंजा गावालगतच्या शेतशिवारात, जंगलात सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगारींना अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरवंजा गावालगतच्या जंगलात कोंबड्यांच्या पायाला कात्या बांधून त्यांच्या झुंजीवर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून कोंबडा बाजारावर छापा टाकला आणि सात आरोपींना अटक केली.

जप्त केलेला मुद्देमाल:

घटनास्थळावरून पोलिसांनी नगदी रोख रक्कम, झुंजीसाठी आणलेले दोन जिवंत कोंबडे, एक जखमी कोंबडा, एक मृत कोंबडा, दोन कात्या (कोंबड्यांच्या पायाला बांधण्याचे धारदार शस्त्र) आणि सात मोटरसायकली असा एकूण ४ लाख ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आले आहे.

यशस्वी कारवाई:

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात, पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र बेसरकर, अशोक मंजुळकर, अनुप आष्टणकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गजानन नागरे, खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार, रोहित चिटगीरे, अंकुश खंडाळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.