Pombhurna News: देवाडा (बु.) येथील रोजगार सेवकाला निलंबित करा

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- तालुक्यातील देवाडा (बु.)येथील रोजगार सेवकाकडून रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता केली जात असून काम मागणाऱ्या गरिब कामगारांकडून जाॅब कार्डच्या नावाखाली पैसे उकळण्याचा काम केल्या जात आहे.एवढेच नव्हे तर योजनेचे पैसे खात्यात टाकण्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागण्याचा गोरखधंदा सुद्धा रोजगार सेवकाकडून केल्या जात असल्याचा आरोप करीत रोजगार सेवकाला तात्काळ पदावरून मुक्त करण्यासाठी व त्याच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावे यासाठी देवाडा बुज.गाववासियांनी
दि.१३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोंभूर्णा येथील पत्रकार भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे मागणी केली आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा (बू.) येथील रोजगार सेवक विकास मेश्राम हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता करीत आहे.गावातील अनेक गरजू बेरोजगार युवकांना रोजगार सेवक हेतुपुरस्सर कामाची संधी नाकारून रोजगार हमी योजनेच्या कामापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.ऐवढेच नव्हे तर गावातील गरजू नागरिकांना जाॅब कार्डसाठी ५०० रुपये घेऊन जाॅब कार्ड बनवून देत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या मजुरांशी हुज्जत घालणे, कामावरून घरी पाठवणे असा गंभीर प्रकार रोजगार सेवक जाणीवपूर्वक करीत असतो.त्यामुळे त्रस्त झालेल्या देवाडा (बू.) गाववासियांनी रोजगार सेवक विकास मेश्राम यांना रोजगार सेवक पदावरून तात्काळ मुक्त करण्यासाठी गावातील महिला व पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे लेखी तक्रार निवेदन सादर केले असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली.

यावेळी अतुल चुधरी, सुरेश झाडे,गिरिधर बदन,प्रदिप भिवनकर, दिनेश बदन,रितीक भिवनकर, किशोर तिवाडे, साईनाथ बदन,चुडामणी बदन, गंगाधर घोडे यांची उपस्थिती होती.

रोहयो अंतर्गत घरकुल बांधकाम होतांना अकुशल कामा अंतर्गत दिली जाणारी देयके देखील लाभार्थ्याला देण्यासाठी पैसे मागितले शिवाय म्हैस गोठासाठी आलेला निधी देण्यासाठी पैसे मागितले असल्याचे पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आले आहे.

देवाडा (बु.) येथील रोजगार सेवकाच्या संबंधाने तक्रार मिळाली आहे.सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
विवेक बेल्लारवार, गटविकास अधिकारी पोंभूर्णा