Rahul pawade: राहुल पावडे यांची उचलबांगडी; ओबीसी समाज नाराज? स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका बसण्याची शक्यता?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भाजपच्या महानगर अध्यक्षपदी आमदार किशोर जोरगेवार गटाचे सुभाष कासनगोट्टूवार तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार समर्थक हरीश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर भाजपमध्ये सत्तेचे वाटप: मुनगंटीवार-जोरगेवार गटांना प्रत्येकी एक जिल्हाध्यक्षपद

या नियुक्त्यांमधून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुनगंटीवार व जोरगेवार या दोन्ही नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणबी समाजातून येणाऱ्या राहुल पावडे यांची उचलबांगडी करून भाजपाने दोन्ही अध्यक्षपदी अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने ओबीसी व मागासवर्गीय पदाधिकारी व मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजप चंद्रपूरमध्ये नव्या नियुक्त्या: जोरगेवार गटाचे कासनगोट्टूवार महानगर अध्यक्ष, मुनगंटीवार गटाचे शर्मा ग्रामीण अध्यक्ष

जिल्ह्यातील भाजप संघटनेवर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र मुनगंटीवार यांच्या वर्चस्वाला प्रथमच आमदार जोरगेवार यांनी धक्का दिला आहे. त्यातूनच मुनगंटीवार समर्थक महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांची उचलबांगडी करीत या पदावर माजी नगरसेवक तथा जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोट्टूवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची पुनर्नियुक्ती झाली आहे, हरिश शर्मा हे मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आहेत. विशेष म्हणजे या निवड प्रक्रियेदरम्यान पक्षात तीव्र वाद निर्माण झाले होते.

मुनगंटीवार-जोरगेवार संघर्ष मिटला? चंद्रपूर भाजपमध्ये समेट

तब्बल २५ वर्षांनंतर ग्रामीण व महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी अभिप्राय नोंदवावे लागले, ज्यामध्ये आजी-माजी आमदारांनी सहभाग घेतला होता. जोरगेवार आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महानगर जिल्हाध्यक्षपद आपल्या गटाकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मुनगंटीवार यांनी महानगर व ग्रामीण अध्यक्ष अशा दोन्ही पदांवर स्वत:च्या समर्थकांची निवड व्हावी यासाठी माघार घेण्यास नकार दिल्याने चंद्रपूरच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर पक्षाच्या कोअर कमिटीने मध्यममार्ग काढत दोन्ही गटांचे समाधान केले.

ओबीसी समाज नाराज? स्वराज्य संस्थेत फटका बसण्याची शक्यता?

भाजपाचे नवनिर्वाचित ग्रामीण व महानगर अध्यक्ष अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे भाजपच्या ओबीसी व मागासवर्गीय पदाधिकारी आणि मतदारांमध्ये आतापासूनच तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात ओबीसी व कुणबी मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यामध्ये भाजपने संघटनात्मक पदांवर ओबीसींना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे. तत्कालीन अध्यक्ष राहुल पावडे कुणबी समाजातून येतात. पावडे यांना डावलल्याने कुणबी समाजही नाराज झाला आहे.