Theft News : हनुमान मंदिरातून मूर्तीचे चांदीचे डोळे अज्ञात चोरांनी केले लंपास!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या पुरातन जागृत हनुमान मंदिरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. आठ दिवसांपूर्वी काही अज्ञात चोरांनी हनुमान मूर्तीचे चांदीचे डोळे काढून नेले आहेत. विशेष म्हणजे, या घटनेला आठ दिवस उलटले असले तरी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायत परिसरात असलेल्या जुन्या जागृत हनुमान मंदिरात हनुमानाची दक्षिणमुखी मूर्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून, शनिवारी रात्री मंदिरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी मूर्तीचे दोन्ही चांदीचे डोळे आणि मूर्तीच्या छातीवरील शेंदूर काढून पळ काढला.

ही चोरीची घटना १६ जून रोजी नागरिकांच्या निदर्शनास आली. दोन दिवस उलटूनही गावकऱ्यांनी स्वतःहून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे अद्याप याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे गावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही गावकऱ्यांनी तर डोळे चोरून नेण्यामागे अघोरी विद्या करणारे लोक असावेत अशी शक्यता वर्तवली आहे. हनुमान मूर्तीचे डोळे अघोरी कृत्यांसाठी चोरले असावेत अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. अज्ञात चोरट्यांचा अद्याप छडा लागलेला नाही.