चंद्रपूर:- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेने आणि ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने अंमली पदार्थाच्या वाढत्या विळाख्याला आळा घालण्यासाठी दिनांक १४ जुलै, २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रुट मार्च काढला.
या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात आली. आजच्या पिढीला व्यसनाचे दुष्परिणाम आणि अंमली पदार्थाचे वापरामुळे होणारे नुकसान याची जाणीव करुन देत, पोलीसांनी नागरिकांना महत्वाचा संदेश दिला. मागील सात महिन्यात जिल्हयात तब्बल १२५ अंमली पदार्थ विरोधी गुन्हे नोंदविण्यात आले असुन नागरिकांना या द्वारे आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही प्रकारची अमली पदार्थाचे सेवन, विक्री, बाळगणे बाबत माहिती असल्यास किंवा शंका असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ यावर कॉल करुन माहिती देवुन चंद्रपूर जिल्हा नशा मुक्त करण्यास पोलीसांना सहकार्य करावे.
दिनांक १४ जुलै, २०२५ रोजी काढण्यात आलेले रुट मार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे समवेत पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर चे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, पोलीस स्टेशन दुर्गापूर चे पोलीस निरीक्षक संदीप ऐकाडे-पाटील, वाहतुक शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील व संबंधीत पोलीस स्टेशन आणि वाहतुक शाखा, दंगा नियंत्रण पथक, सी-६० क्युआरटी पथकाचे कमांडोसह पोलीस अधिकारी व महिला व पुरुष अंमलदार मोठया संख्याने उपस्थित होते.