accident News: एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...

Bhairav Diwase
संग्रहित छायाचित्र 

गडचिरोली:-
अज्ञात ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने शोकसागरात बुडालेल्या काटली गावातून शुक्रवारी सायंकाळी चौघांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली आणि अवघा गाव हमसून, हमसून रडला. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात तनवीर बालाजी मानकर (वय १६), टिंकू नामदेव भोयर (१४), दुष्यांत दुर्योधन मेश्राम (१५), तुषार राजेंद्र मारबते (१३, सर्व रा. काटली, ता. गडचिरोली) या चौघांचा मृत्यू झाला. आदित्य धनंजय कोहपरे (१४), क्षितिज तुळशीदास मेश्राम (१३) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक सापडेना, पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी: 

अपघातानंतर 'ट्रकचालकास अटक करा,' अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी गडचिरोली-आरमोरी मार्गावरील दुकाने, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

अश्रूंचा फुटला बांध:

जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. चारही मुलांची सायंकाळी साडेसहा वाजता गावातून एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.

अश्रूंनी वातावरण सुन्न:

गावालगतच्या तलावाजवळ चार स्वतंत्र सरणावर त्यांना भडाग्नी दिला. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. कुटुंबीय व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके व अश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते.