दोन नायब तहसीलदार आणि पाच कर्मचारी जखमी
चंद्रपूर:- चंद्रपूर येथे एका बैठकीसाठी जात असलेल्या शासकीय वाहनास ट्रकने धडक दिली. शासकीय वाहन उलटून झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी जखमी झाले. ही घटना गुरुवार (ता. २१) सकाळी दहा वाजता मूल ते चंद्रपूर मार्गावरील डोणी फाटयाजवळ घडली. ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार आणि पाच कर्मचारी चंद्रपूर येथे एमएच ३४ सीडी ७५६२ या क्रमांकाच्या शासकीय वाहनाने जात होते.
मूलपासून पाच किमी अंतरावर असलेल्या डोणी फाटयाजवळ मूलकडे येणाऱ्या एम. एच. ३४ बीझेड ६७९७ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. शासकीय वाहनाच्या चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून कडेला कोसळले.
त्यात नायब तहसीलदार विनोद मधुकर बोदे (वय ५५), महानंदा हिरामण मडावी (वय ५०), चालक सूरज रामक्रिष्णा नियते, कर्मचारी सरिता बाळकृष्ण चन्ने, प्रिया गुलाबराव शेंडे, दुर्गा तेजराम गायकवाड,आशा दिलीप कोहले जखमी झाले.
त्यांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपले वाहन सोडून ट्रक चालक पसार झाला. दोन्ही वाहने पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.