Amma ki padhai : "अम्मा की पढ़ाई"चा वाद पुन्हा पेटला

Bhairav Diwase
आ. जोरगेवार यांच्या कार्यकर्त्याचे 'वादग्रस्त' विधान
चंद्रपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या ‘अम्मा की पढ़ाई’ या उपक्रमावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीने या उपक्रमाला सुरुवातीपासून विरोध दर्शविला होता. नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी हा उपक्रम इतर ठिकाणी हलविला असला तरी आता त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या वादग्रस्त विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. 
अलीकडेच, आमदार जोरगेवार यांच्या एका कार्यकर्त्याने “हाथी चलता है कुत्ते भोकते हैं” असे विधान केले. या विधानाचा संदर्भ ‘अम्मा की पढ़ाई’ विरोधकांकडे असल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीचे नेते अनिल रामटेके यांनी केला आहे. त्यांनी हे विधान धमकीजनक आणि भडकाऊ असल्याचे सांगत तीव्र निषेध व्यक्त केला.


पत्रकारांशी बोलताना रामटेके म्हणाले, “दीक्षाभूमी परिसरातील ऐतिहासिक आणि बौद्ध समाजासाठी पवित्र असलेल्या जागेत सुरू झालेल्या उपक्रमाला आम्ही ठाम विरोध केला होता. त्यानंतर उपक्रम दुसरीकडे सुरू करण्यात आला, परंतु वाद थांबविण्याऐवजी आमदारांचे कार्यकर्ते आंदोलनकर्त्यांविरुद्ध अश्लील आणि भडकाऊ भाषेत वादग्रस्त बोलत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे.” 


रामटेके यांनी पुढे आव्हान दिले की, जर आमदारांचे कार्यकर्ते खरोखर धाडसी असतील तर त्यांनी अशा पद्धतीने पाठीमागून विधान न करता, थेट त्यांच्यासमोर येऊन चर्चा करावी.


दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी अलीकडेच केलेल्या विधानात ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमातून 27 विद्यार्थी MPSC स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा दावा केला होता. या दाव्यावरही रामटेके यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले, की “अवघ्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या उपक्रमातून विद्यार्थी MPSC उत्तीर्ण होणे वास्तवात शक्य नाही. अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये.” या संपूर्ण प्रकरणामुळे ‘अम्मा की पढ़ाई’भोवतालचा वाद पुन्हा चिघळला असून, राजकीय व सामाजिक पातळीवर नवे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.