गडचिरोली:- गडचिरोली-आरमोरी महार्गावरील काटली येथे भरधाव ट्रक चालवून चार गरीब विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या ट्रकचालकासह त्याच्या सहकाऱ्यास पोलिसांनी ४८ तास शोध मोहीम राबवून अटक केली आहे. प्रवीण बाळकृष्ण कोल्हे(२६) व सुनील श्रीराम मारगाये(४७) दोघेही रा.चिचगड, जि.गोदिया अशी आरोपींची नावे आहेत.
७ ऑगस्टला पहाटे गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील काटली येथील सहा मुले फिरावयास गेली असता ट्रकचालकाने अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवून सहाही मुलांना चिरडले. यात पिंकू नामदेव भोयर(१४), तन्मय बालाजी मानकर(१६), दिशांत दुर्योधन मेश्राम(१५) व तुषार राजेंद्र मारबते(१४) हे चार विद्यार्थी ठार झाले, तर आदित्य कोहपरे व क्षितीज तुळशीदास मेश्राम हे दोघे जखमी झाले होते. एवढा भयावह अपघात झाल्यानंतरही ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला होता. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन करुन वाहतूक बंद पाडली होती. शिक्षणमंत्री दादा भुसे हेही काटली येथे गेले होते. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.
जिल्हावासीयांचा संताप बघता पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपासासाठी पाच वेगवेळी पथके तयार केली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षदार, सीसीटीव्ही फूटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने ४८ तासांच्या आत ट्रकचा छत्तीसगड राज्यातून शोध घेतला. नागपूर येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकाकडून प्राप्त पुराव्यांच्या आधारे ट्रकचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर ट्रकचालक प्रवीण कोल्हे व सहचालक सुनील मारगाये यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण घटनेचा तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुळ राज, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.