गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. शेताच्या जवळ असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हा तरुण रक्षाबंधनाच्या सुट्टीच्या निमित्ताने गावी आला होता. महावितरण विभागात असिस्टंट इंजिनिअर या पदावर तरुण कार्यरत होता अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर असलेल्या तरुणाचा गडचिरोलीमध्ये मृत्यू झाला आहे. या तरुणाचे नाव दलसु नरोटे असे आहे. ते नांदेड तालुक्याच्या मुखेड येथील महावितरण विभागात कार्यरत होते. दलसु नरोटे यांच्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून ही घटना गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील कारमपल्लीत घडली आहे.
जागतिक आदिवासी दिवस, रक्षाबंधन आणि लगेच रविवार अशा लागोपाठ सुट्टा असल्याने दलसु नरोटे हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन त्यांच्या गावी आले होते. काल शुक्रवारी (८ ऑगस्ट) दलसु हे शेतामध्ये रोवणीचे काम सुरु असल्यामुळे शेतावर गेले होते. ते शेताच्या जवळच्या नाल्यावर गेले. तेव्हा दुर्घटना घडली.
शेतालगत असलेल्या नाल्यावर फिरत असताना दलसु यांनी फिट (मिर्गी) आली. यामुळे ते नाल्याच्या पाण्यात पडले. शरीराची हालचाल न करता आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. बऱ्याच वेळापासून दलसु घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कुटुंबीयांना दलसु पाण्यात पडले असल्याचे दिसले. या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.