८ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी
गडचिरोली:- दुचाकीने कुटुंब घेऊन सिरोंचाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक बसली आहे. या अपघातात आठ वर्षीय मुलगा जागीच मृत्यू, तर आई-वडील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील अंकिसा मार्गावर घडली.
शौर्य संतोष कोक्कू (वय ८) असे मृत मुलाचे नाव असून वडील संतोष रामलू कोक्कू (वय ४३) व आई सौंदर्या कोक्कू (वय ३६) अशी जखमींची नावे आहे.
असरअल्ली येथील संतोष कोक्कू हे पत्नी व मुलाला घेऊन आपल्या नातेवाइकाकडे रक्षाबंधनासाठी दुचाकीने सिरोंचाकडे जात होते. मात्र, अंकिसा गावाजवळ पोहोचताच दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक बसली.
अरुंद मार्ग, उभी केलेली ट्रॉली आणि वेळीच दिसून न आल्याने ही घटना घडली. या धडकेचा जोर इतका होता की, यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला. संतोष कोक्कू यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून सौंदर्या कोक्कू किरकोळ जखमी झाल्या. त्यांना सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेण्यात आले.
संतोष कोक्कू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वारंगल येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सौंदर्या कोक्कू यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.