Indian Soldier Accident : ट्रॅक्टर-दुचाकी भीषण अपघातात भारतीय सेनेतील जवान ठार

Bhairav Diwase
चंद्रपूर:- नेरी-जांभूळघाट मार्गावरील रामपूर गावाजवळ शनिवारी (९ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोहाडी (ता. नागभीड) येथील भारतीय सेनेतील जवान अविनाश शामराव खेडेकर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, सदर ट्रॅक्टर कुणाचा आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनानिमित्त अविनाश खेडेकर यांच्या पत्नी व धाकट्या भावाची पत्नी सकाळी कळमगाव येथे आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी अविनाश रॉयल एनफिल्ड (एम एच 34 बी डब्लू-100) दुचाकीने मोहाडीवरून कळमगावकडे जात होते. दरम्यान, रामपूरजवळ समोरून भातपिकांची रोपणी आटोपून ट्रॅक्टर धुवून परत येत असताना दुचाकीची ट्रॅक्टरच्या कॅजवीलला भीषण धडक झाली.


अपघात एवढा जबरदस्त होता की ट्रॅक्टरचे कॅजवील तुटून रस्त्याच्या कडेला पडले. धडकेचा जोर एवढा होता की अविनाश रस्त्यावर बऱ्याच अंतरावर फेकले गेले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे हलविण्यात आला. पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.