नागरिकांच्या चकरा आता होणार बंद
पोंभूर्णा:- तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयाला असणाऱ्या सुट्ट्या व वेळेवर अधिकारी कर्मचारी उपस्थित न राहणे यामुळे कार्यालयात आल्यानंतर दाखल्यांसाठी हेलपाटे व अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे हेलपाटे व अडचणी कमी करण्यासाठी दाखला मिळेल, अशी व्यवस्था केली आहे पोंभूर्णा तहसीलदारांने महसूल सप्ताहाचे औचित्य साधून दाखले QR कोड उपक्रम या विशेष सुविधेचेचे दि. ५ ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी सुरू केले आहे.
या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले QR कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत. यामुळे वेळ, प्रवास आणि अनावश्यक त्रास वाचून, आवश्यक सेवा डिजिटल स्वरूपात आणि पारदर्शक पद्धतीने प्राप्त होणार आहेत.हि सेवा नेहमीसाठी रहाणार असून क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले.
सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. नागरिकांना सुलभता होईल असे उपक्रम राबविले जात आहेत.पोंभूर्णा तहसिलदार मोहनिश शेलवटकर यांनी दाखले QR कोड उपक्रम या विशेष सुविधेचे उपक्रम सुरू केले.या उपक्रमाअंतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,भूमिहीन दाखला,शेतकरी दाखला,अधिवास प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच महसूल विभागामार्फत दिले जाणारे इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत.
काही वेळा अधिकारी,कर्मचारी दौऱ्यावर असतात.कार्यालय बंद असते किंवा सुट्टीमुळे काम होऊ शकत नाही.दाखले मिळतील यासाठी नागरिक दूरवरून आलेले असतात. कार्यालयाची वेळ संपली असेल, किंवा दुसऱ्या दिवशी दाखला नोकरी किंवा प्रवेशासाठी अत्यावश्यक असेल तर तहसील कार्यालयात असलेल्या QR कोडवर दाखल्याची पावती पाठवल्यास तहसील कार्यालयातून शक्य तितक्या लवकर काम कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.नैसर्गिक आपत्ती, सलग सुट्ट्या अशा प्रसंगी कोणतेही नुकसान होऊ नये हा तहसील कार्यालयाचा हेतू आहे.हा उपक्रम पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांना महसूल सेवा अधिक सुलभ, वेळेत आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी व्यक्त केला आहे.
दाखले QR कोड उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मोहनिश शेलवटकर, सामाजिक कार्यकर्ते जगन येलके, वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार,नायाब तहसीलदार रामकृष्ण उईके, दिपाली आत्राम, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके यांचे हस्ते करण्यात आले.
क्यूआर कोडचा वापर कसा करावा?
1) तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये (WhatsApp) उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर (Dots) क्लिक करा.
2) मेनूमधून 'सेटिंग्स' (Settings) निवडा.
3) वरच्या बाजूला दिसणाऱ्या क्यूआर कोड चिन्हावर (QR Code Icon) क्लिक करा.
4) 'स्कॅन कोड' (Scan Code) निवडून पोंभूर्णा तहसील कार्यालयाचा क्यूआर कोड स्कॅन करा.
5) त्यानंतर, तुम्हाला आवश्यक असलेल्या दाखल्याची पावती पाठवा.
याव्यतिरिक्त, अधिक माहितीसाठी किंवा शासनाच्या इतर सेवांसाठी तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक 9422475743 चा वापर करू शकता. हा उपक्रम पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांसाठी महसूल सेवा अधिक सोपी आणि डिजिटल बनवेल असा विश्वास तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी व्यक्त केला.