महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत आपल्या करुणामयी स्पर्शाने धम्मदीक्षेचा दीप प्रज्वलित केला. ही दीक्षा केवळ धर्मग्रहण नव्हे, तर आत्मोद्धार, समता, आणि शिक्षणाच्या क्रांतीची ग्वाही होती. त्याच प्रेरणेतून शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू केला
या उपक्रमात 284 गरीव व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन दिले जात होते. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच दिनांक ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला. यामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचे समाधान आहे. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हे, तर त्या मुलांच्या स्वप्नांना हात देणाऱ्या धम्मकार्याची साक्ष आहे. मात्र, या कार्याला काही राजकीय पक्षांचा विरोध उभा राहिला. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो, त्यांचाही आम्ही मन:पूर्वक आदर करतो. परंतु हे केंद्र नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे समजवण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू शकतो. किंवा, हा एक विधायक सामाजिक उपक्रम राजकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडून बळी गेला असेल — हे सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे. उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे तेज होतं, त्याच डोळ्यांत आज अश्रू आहेत – ही बाब अस्वस्थ करणारी आहे.
स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं... आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. नवीन जागेची शोधाशोध व पुनर्रचना करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे.
या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तात्पुरता थांबा लागेल, याचे दुःख आहे. आम्ही त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, याचे मनस्वी वाईटही वाटते. पण हे कार्य इथे थांबणार नाही. कारण शिक्षण ही बाबासाहेबांची खरी दीक्षा आहे, आणि ही आमची धम्मसेवा आहे. असे सांगत, ‘ज्योत विझलेली नाही — ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे,’ असेही आ. किशोर जोरगेवार यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे. या प्रवासात आमच्यासोबत उभं राहिलेल्या प्रत्येकाचा आम्ही ऋणी आहोत