नवी दिल्ली:- देशाच्या आर्थिक विकासाला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) अधिक बळकट करण्याच्या दिशेने केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, सीआयएसएफची संख्या २.२ लाखांपर्यंत वाढवली असून २०२९ पर्यंत ७०,००० कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.
या नव्या योजनेनुसार पुढील पाच वर्षांसाठी सीआयएसएफमध्ये दरवर्षी १४,००० जवान भरती केले जातील. २०२९ पर्यंत एकूण ७०,००० जवानांची भरती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे केवळ दलाची ताकदच वाढणार नाही, तर तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होणार आहेत.
भारतातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, हवाई वाहतूक, बंदर, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, जम्मू-काश्मीरमधील कारागृह यांसारख्या क्षेत्रांमध्ये CISF चे मजबूत आणि कार्यक्षम पथक तैनात करणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये नक्षलवाद कमी झाल्याने, नवीन औद्योगिक केंद्रांच्या उभारणीची शक्यता आहे. या युनिट्सना व्यापक आणि प्रभावी सुरक्षा देण्यासाठी सीआयएसएफची मजबूत उपस्थिती आवश्यक असेल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
भरती प्रक्रियेत मुलींना अधिक संधी!
२०२४ मध्ये १३,२३० जवानांची भरती करण्यात आली असून, २०२५ मध्ये आणखी २४,०९८ जवानांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासोबतच महिला उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे, कारण CISF महिलांना अधिक संधी देण्याच्या दिशेने सकारात्मक धोरण राबवत आहे. या संख्यावाढीमुळे, सीआयएसएफला एक अतिरिक्त बटालियन उभारता येणार आहे, जी अंतर्गत सुरक्षा कर्तव्ये आणि आपत्कालीन तैनातीसाठी उपयुक्त ठरेल," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये CISF च्या नव्या युनिट्स तैनात
गेल्या वर्षभरात महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये CISF च्या नव्या युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे:
संसद भवन परिसर, नवी दिल्ली
अयोध्या विमानतळ
हजारीबाग येथील एनटीपीसी कोळसा खाण प्रकल्प
पुण्यातील आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV)
बक्सर औष्णिक ऊर्जा प्रकल्प
एटा येथील जवाहर औष्णिक ऊर्जा प्रकल्प
मंडी येथील बियास सतलज लिंक प्रकल्प
याशिवाय, संसद भवन परिसर आणि जवाहर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात अग्निशमन दलाच्या दोन नवीन युनिट्सचीही स्थापना करण्यात आली आहे.