रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात अनोखा निषेध
चंद्रपूर:- शहर काँग्रेस कमिटीने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात एक अभिनव आंदोलन केले. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बागला चौक ते कामगार चौक या रस्त्याला 'इव्हेंट आमदार मार्ग' असे नाव देऊन आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनादरम्यान, काँग्रेस नेत्यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली. काँग्रेसने आरोप केला आहे की, आमदार शासकीय निधीचा वापर केवळ स्वतःची जाहिरात करण्यासाठी करत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रितेश उर्फ रामू तिवारी यांनी म्हटले आहे की, "संपूर्ण चंद्रपूर शहर खड्ड्यांनी भरले आहे आणि महानगरपालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आम्ही वारंवार यावर लक्ष वेधले, पण काहीही उपयोग झाला नाही. आमदारांना जनतेच्या वेदना दिसत नाहीत कारण ते केवळ इव्हेंट्स आणि प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहेत."
या आंदोलनात, काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन 'खड्डे मुक्त चंद्रपूर' आणि 'इव्हेंट आमदारांचा निषेध' अशा घोषणा दिल्या. काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिका आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

0 टिप्पण्या