Amma ki padhai : "अम्मा की पढाई" च्या नावाने झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे

Bhairav Diwase
दीक्षाभूमी बचावासाठी संघर्ष समिती आक्रमक
चंद्रपूर:-"दिक्षाभूमी बचाव संघर्ष समिती"ने "अम्मा की पढाई" अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूरमधील ऐतिहासिक दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील "अम्मा की पढाई" च्या नावाने झालेले अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीने केली आहे. 

समितीचे अनिल रामटेके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दीक्षाभूमी ही बौद्धांसाठी एक पवित्र ऊर्जाभूमी असून, ती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. याच ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची स्थापना केली होती.


रामटेके यांनी आरोप केला की, अलिकडे दीक्षाभूमीचे सौंदर्यकरण करण्याच्या नावाखाली तिची जागा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय, आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात "अम्मा की पढाई" या नावाने अतिक्रमण केले आहे. त्यांनी सांगितले की, ही बाब संतापजनक असून, यामुळे दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व कमी होत आहे.

समितीने आपल्या पत्रकार परिषदेत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू असलेले "अम्मा की पढाई" चे स्पर्धा परीक्षेचे वर्ग कायमचे बंद करावेत.

2) दीक्षाभूमीच्या आत किंवा परिसरात कुठलेही सौंदर्यकरण करू नये, जेणेकरून नियोजित जागा अपुरी पडणार नाही.

3) दीक्षाभूमीला लागून असलेले चांदा क्लब ग्राऊंड कायमस्वरूपी दीक्षाभूमीला देण्यात यावे. दीक्षाभूमीच्या विश्रामगृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नाव देण्यात यावे.

4) येत्या १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षाभूमी समारंभात कोणत्याही राजकीय (काँग्रेस, भाजप) लोकांना कार्यक्रमात नियमित करू नये.
 
दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेले अतिक्रमण आठ दिवसात हटवले नाही, तर आमच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. असा इशारा रामटेके यांनी दिला.