पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीतील प्रकार
भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षकानेच प्रशिक्षणार्थी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
भंडारा येथे अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेतात. याच केंद्रात प्रशिक्षण देणाऱ्या नितेश हिवरकर (वय ३९, रा. सोनेगाव, ता. पवनी) या प्रशिक्षकाने एका तरुणीकडे अश्लील मागणी केली. यामुळे ती तरुणी खूप घाबरली होती.
मित्राने केला जाब विचार, त्यालाही जातीवाचक शिवीगाळ:
तरुणीने घडलेला प्रकार तिच्या मित्राला सांगितला. त्यानंतर मित्राने प्रशिक्षक नितेश हिवरकर याला जाब विचारला. मात्र, पश्चात्ताप होण्याऐवजी प्रशिक्षकाने तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मित्राने लगेच अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची तात्काळ कारवाई :
या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. प्रशिक्षक नितेश हिवरकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेमधील (BNS) कलम 75 (2), 351, 352(2) सहकलम 3(1) (आर )(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.