चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश ढेंगळे यांच्यावर एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पीडित तरुण सौरभ झाडे आणि मनसे पदाधिकारी राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
नेमकी घटना काय?
वरोरा तालुक्यातील चिनोरा गावात कोणत्याही परवानगीशिवाय मोबाईल टॉवर उभारण्यात येत असल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती विचारणाऱ्या सौरभ झाडे या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश ढेंगळे यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. सौरभ झाडे याचे नंदोरी येथे मेडिकल दुकान आहे. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो, असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता. चिनोरा गावात आधीच एक टॉवर असताना दुसऱ्या टॉवरची गरज काय, अशी विचारणा त्याने केली होती. या संदर्भात त्याने ग्रामपंचायत सदस्याकडे एनओसी (NOC) बाबत विचारणा केली असता, कोणत्याही प्रकारचे एनओसी पत्र दिले नसल्याचे समोर आले.
सौरभला फोनवरून अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
याच गोष्टीचा राग आल्याने अविनाश ढेंगळे यांनी सौरभला फोनवरून अश्लील शिवीगाळ केली आणि त्याला व त्याच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सौरभ झाडे याने 11 ऑगस्ट रोजी वरोरा पोलीस ठाण्यात अविनाश ढेंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाची पोलीस प्रशासनाकडे प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी
या दरम्यान, ढेंगळे काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना घरी पाठवून सौरभला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे, अविनाश ढेंगळे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी सौरभ झाडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावर, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.