Shri Krishna Janmashtami Festival: चंद्रपूरमध्ये इस्कॉनतर्फे भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आंतरराष्ट्रीय कृष्णाभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनने चंद्रपूर शहरात रविवार, १७ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागपूर रोडवरील शकुंतला फार्म्स येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा उत्सव साजरा होणार आहे. 


इस्कॉनच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण कृपामूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आणि श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे, ज्यात:
 * प्रेरणादायी कृष्णकथा (हरिकीर्तन प्रभु यांच्याकडून)
 * मधुर हरिनाम संकीर्तन
 * मनमोहक झूलन यात्रा
 * गिरिराज गोवर्धन परिक्रमा
 * ५६ भोग अर्पण
 * अभिषेक आणि महाआरती
याव्यतिरिक्त, भगवान श्रीकृष्णाच्या लीला आणि उपदेशांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.

कार्यक्रमात मान्यवर उपस्थिती
या सोहळ्याला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, स्वामीनारायण मंदिराचे भागवताचार्य मनीष महाराज, समाजसेवक मनोज पॉल, महिला अध्यक्षा छबू वैरागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांसाठी स्वादिष्ट महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. इस्कॉनचे पदाधिकारी रमेश बिराजदार, आचार्य वैशिष्ठ दास, पंकज जानवे, कौशिक भट्ट, विजय साळुंके यांनी सर्व भाविकांना त्यांच्या कुटुंबियांसह या शुभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.