हनुमान मंदिर सभागृहासाठी २५ लाख रुपये मिळणार
पोंभुर्णा:- तालुक्यातील चेकआष्टा येथील श्री. हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सप्ताह कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात सध्या भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या पवित्र सोहळ्याला आ. सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहून मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात शांतता आणि आध्यात्मिक समाधान मिळते.
विकासासाठी २५ लाखांचा निधी:
ग्रामस्थांची गरज लक्षात घेता, हनुमान मंदिर परिसरातील सभागृह बांधकामासाठी पूर्वी जाहीर केलेल्या १५ लाख रुपयांच्या निधीत आता १० लाखांची वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण २५ लाख रुपये या कामासाठी मंजूर करण्यात येणार आहेत. या सभागृहाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून, मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील यावेळी देण्यात आली.





