चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप - शिवसेना - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे उद्या चंद्रपूर दौर्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकुम येथील चवरे मैदान येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.
महायुतीच्या प्रचारात नवचौतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सभेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकत नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीची भूमिका आणि पुढील विकासदृष्टी ते यावेळी मांडणार आहेत.
दुपारी 2.30 वाजता मोरवा विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. तर 3 वजाता सभेला सुरवात होणार आहे. या जाहीर सभेद्वारे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरातील विकासकामे, पायाभूत सुविधा, घरपट्टे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, रोजगार आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही प्रदेशाध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

