चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आजचा नियोजित चंद्रपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. महायुतीच्या प्रचारासाठी तुकुम येथील चवरे मैदानावर आयोजित करण्यात आलेली भव्य जाहीर सभा आता लांबणीवर पडली आहे.
आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट) या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज चंद्रपुरात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली होती. तुकुम परिसरातील चवरे मैदानावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार होती.
मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर येत असल्याने, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना तेथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याच तातडीच्या कारणास्तव चव्हाणांचा चंद्रपूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.

