चंद्रपूर:- मद्यधुंद अवस्थेत घरात वाद झाल्याने राग अनावर होऊन मोठ्या भावाने धाकट्याची डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करून निर्घून हत्या केली. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बुधवार ७ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता घडली. दरम्यान या हत्याकांडातील पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने मृतकाचे शव रेल्वे रूळावर टाकून अपघातात भाऊ दगावल्याचे चित्र रंगविण्यात आले. मृत धाकट्या भावाचे नाव गणेश विश्वनाथ भोयर (२५ ) रा.इंदिरा नगर वार्ड विसापूर ता.बल्लारपूर असे आहे.
या घटनेतील प्रकरणात आरोपी भाऊ गुरूदास विश्वनाथ भोयर ( २७ ), वडील विश्वनाथ झुंगा भोयर ( ७१ ) व आई कौशल्या विश्वनाथ भोयर ( ५५ ) यांना बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ भोयर यांची कौशल्या ही दुसरी पत्नी आहे. त्यांना पहिल्या पत्नीचे दोन मुले व दुसऱ्या पत्नीचे दोन मुले आहे. यातील पहिल्या पत्नीचे दोन्ही मुले वेगवेगळे राहत आहे. मात्र विश्वनाथ, कौशल्या,गुरूदास व गणेश एकत्र राहत होते. बुधवारी रात्री गणेश व गुरूदास या भावंडांत दारू पिऊन भांडण झाले.ते विकोपाला गेले.
रागाच्या भरात गुरूदासने गणेशच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात गणेश जागीच कोसळला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यावर घरातील तिघेही शांत झाले. विशेष म्हणजे घटनेची माहिती शेजाऱ्यांना देखील झाली नाही. मध्यरात्री १२ ते १ वाजता दरम्यान खुनातील पुरावे नष्ट करायची योजना आरोपींनी आखली. गुरूदास भोयर याने मृत गणेश च्या पायाला दोरी बांधून गोंदिया – बल्लारपूर रेल्वे मार्गावर ओढत नेले. हा प्रकार रात्री गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी दामाजी नरोटे यांच्या लक्षात आला. त्याने रात्री या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.रेल्वे पोलिसांनी बल्लारपूर ठाण्याच्या पोलिसासोबत संपर्क साधून घटनेबाबत अवगत केले.
घटनेचे गांभीर्य ओळखून बल्लारपूर पोलिसांनी सकाळी डाग स्कॉड पाचारण करून हत्याकांडातील माग काढला.त्यावेळी पोलिसांना जबर धक्का बसला. ज्या ठिकाणी गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ती जागा स्वच्छ करण्यात आली होती. संगनमत करून आई,वडील व मोठ्या भावाने धाकट्याच्या काटा काढल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गणेश चा मोठा भाऊ गुरूदास, वडील विश्वनाथ व आई कौशल्या भोयर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

