Chandrapur News : कपडे धुण्याचं निमित्त झालं, आईच्या डोळ्यांदेखत काळजाचा तुकडा हिरावला

Bhairav Diwase
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथील 12 वर्षीय बालकाचा बोकडोह नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 6 ऑगस्ट) सकाळी घडली. ही घटना त्याच्या आईसमोरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत बालकाचे नाव लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार (वय 12) रा. खातगाव असे आहे.

 बुधवारी सकाळी लोकेश आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गावाजवळील बोकडोह नदीवर गेला होता. आई कपडे धुत असताना लोकेश अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना त्याच्या आईच्या डोळ्यासमोर घडल्याने ती स्तब्ध झाली.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. लोकेशच्या आकस्मिक मृत्यूमुळे वरखडवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खातगाव गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.